पाखरमाया


खूप वर्षांपूर्वी माझ्या आईने एक व्रत हाती घेतले. आपल्या घराच्या भोवती पक्ष्यांना पिण्यासाठी मातीची भांडी ठेवायची. बारा महिने हे व्रत तिने मनोभावे पाळले. घरा भोवती किती तरी प्रकारचे पक्षी जमू लागले. पुढे जेंव्हा photography चा छंद जडला तेंव्हा फोटो काढण्यासाठी कुठे जायची गरजच नव्हती. खूप गोष्टी घडल्या. पक्ष्यांना, खारूताईंना घराभोवती खेळतांना बघतांना आमच्या कुटुंबाचे दिवस आनंदात जाऊ लागले.
असंच एक दिवस आमच्या या प्रयोगाचे वर्णन आमची मैत्रीण, गुरु अंबुजा साळगावकर यांना सांगितले आणि त्यांनी त्यांच्या सुंदर शैलीत या सर्व पाणी प्रपंचावर एक लेख लिहिला. तो लेख इथे सर्वांसाठी प्रकाशित करत आहे.
हा लेख इथे लिहिण्याचा हेतू हाच की यामुळे जर कुणाला प्रेरणा मिळाली तर जरूर हा प्रयोग आपल्या घरी करून बघा.
भिजवलेल्या धान्याचं मुटकुळं हातात धरुन आई टेरेसवर पोहोचली. संध्याकाळपर्यंत सुकेल म्हणून तिने ते धान्य एका कोपर्‍याला पसरलं आणि खाली येऊन दिवसभराच्या व्यापात रमून गेली. ऑफिसमधून आलेल्या अमोलच्या चाहुलीने संध्याकाळ झाल्याचं जाणवलं तशी तिला टेरेसवरच्या धान्याचीही आठवण झाली. अंधारात आईने कशाला धडपडायचे म्हणून आल्यापावली अमोल टेरेसवर गेला. अंदाजाने धान्य वाळत घालण्याच्या जागी धुंडाळले तर काही दाणेसुद्धा हाताशी लागेनात. अगदी आई म्हणते खरी पण ती धान्य पसरायला विसरली तर नसेल अशी शंका घ्यावीशी स्थिती. दुसरीकडे कुठे वाळवण घातले का असे विचारता आई म्हणते नेहमीच्याच जागी तर घातले. आता तिथे औषधालासुद्धा दाणे नाहीत, कुणी नेले तर नसतील असे अमोलने आश्चर्य व्यक्त करावे नि त्यावर, कुणी कशाला पाखरांनी नेले असेल असे आईने सहज म्हणावे असे घडले.
अरेरे, अमोलने किंचित खेद व्यक्त केला नि त्यावर आईने म्हटले, पाखरांना चारापाणी घालावं. हळहळ कशाला? कष्टांनी पोट भरणार्‍या कुणाच्याही ओठी घास जावा आपल्या हातून. मी तर म्हणते, कधीमधी एखादी चपाती, थोडा भात उरला तर तो टाकून नका देत जाऊ. कुस्करा करुन टेरेसवर टाकत चला. पाखरांची दुवा लागेल. आईच्या या उपदेशावर अमोल नि अर्चना दोघांनी मान हलवली. इतके दिवस आपल्याला कसं सुचलं नाही याचे त्यांना आश्चर्य वाटले. पुण्यासारख्या गावांत, चांगल्या वस्तीत राहतांना वॉचमनलाही जास्त झालेले अन्न कुणी दिले तर रुचत नाही, भिकारी वेळेवर सापडत नाही, राहीलेले अन्न कचराकुंडीत टाकून द्यायचे तर जीवावर येते. गावांत कसे, हक्काची गुरे असतात, त्यांना घातले कि झाले. कष्टाने मिळवून मातीत घालण्याचे नको असे त्यांना राहून राहून वाटत आलेले. आईने हा छानच तोडगा काढलेला…
आईची अशी प्रज्ञा त्यांना नवखी नव्हे. खरेतर लहानपणापासून तिच्या लोकोपयोगी पडण्याच्या, परिस्थितीनुसार जपून राहून शिक्षण घेण्याच्या, नेहमीच प्रामाणिक राहण्याच्या आग्रहाचा संस्कार मुलांवर होताच. पुष्कळशा पालकांच्यात हे गुण असतात. आईचे मुक्याप्राण्यांचे, पाखरांचे वेड तसे थोडे वेगळे. प्राण्यांनी नि पक्षांनीही तिच्या प्रेमाची कदर केली त्याची एक कहाणी तर सर्वांनी थक्क होऊन ऐकावीशी.
मॅडम, दुष्काळी जिल्ह्याच्या आमच्या गावात एरव्हीसुद्धा उन्हाळाच, उन्हाळ्यात तर उन मी म्हणत असते. माणसांच्या तहानेला पुरेसे पाणी मिळवणे मुष्कील होते. तिथे माझी आई पाखरांची काळजी करायची. अर्थात तिची ती काळजी अनाठायी नव्हेच. आपण इतके मोठे जीव, धडधाकट. कुठून तरी उपसा करुन पाणी आणू. पाखरे काय करतील? आपल्याला उन्हापासून विसावायला घराचे छप्पर आहे, बाहेर काम करण्याच्या वेळा नाही म्हटले तरी आपण हवामानानुसार सोयीने पुढे मागे करुन घेतोच. पाखरे, इवलाले जीव. आकाशातून भरारी नाही घेतली तर दाणे कोण आणून देईल त्यांना घरट्यात? उन्हासाठी छत्री, पंखे असे सारे त्यांना थोडीच असते? आमच्या सोनुसारखी पाण्याची बाटलीसुद्धा त्यांना वाहता येत नाही. दाण्यासाठी दूर जात जात राहतील, त्यांना तहान लागेल, इकडे तिकडे पाहतील तर या वणव्यात पाणी कुठे? आपण हा विचार करायला हवा. आईचे विचार अमोलच्या मुखातून माझ्यापर्यंट पोहोचत होते.
पाखरे आपल्या जीवनाचा भाग आहेत. चिऊ-काऊच्या गोष्टीशिवाय न झोपणारा, त्यांच्या आठवणींशिवाय घास न घेणारा बाळ मोठा होतो तेव्हा त्याला त्याच्या या चिमणदोस्तांचा विसर पडतो. गोड गाणी गाऊन रिझवणे तर आहेच पण बिया नि परागांच्या वहनांने झाडे लागतात ती पक्षांच्या वावरण्यांतून. कितीतरी पक्षी आपला भवतांल स्वच्छ ठेवण्यात मूकपणे कार्यरत असतात. त्या छोट्या जीवांच्या या मोठ्या योगदानाची आपल्याला जाणीव असायला हवी. पक्षांच्या कितीतरी गोष्टी आई सांगत असते. पाखरे आम्हाला आमची वाटायला लागतात त्यामधून. अमोलचे हे शब्द त्याच्या आईचे कर्तृत्व अनमोल आहे असे अधोरेखित करणारे. अमोलने पुढे सांगितलेली गोष्ट ऐकून तर माझ्या अंगावर रोमांच उठलेले… तोच तो अनुभव आपल्याला यावा म्हणून हा प्रपंच.
मॅडम, मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे, माझा निष्कर्ष मांडणार आहे, गणित आणि विज्ञानाला पटणारा प्रयोग नि सिद्धता मला देता येणार नाही. पुष्कळशा लोकांनी मला वेड्यातही काढले आहे त्याबद्दल पण तुम्ही तसे करणार नाहीत. तुमचे संवेदनाशील मन माझ्या विचारांचा विचार करेल. ऑफिसची वेळ होत आलेली असतांनाही मी गोष्ट ऐकण्यास उत्सुकतेने सरसावून बसले. अमोलची गोष्ट सुरु झाली.
तुम्हाला माहीती आहे का, उन्हाळ्यात दूरवरुन रपेट करुन आलेल्या पाहुण्यांसाठी गावांतल्या घरांत ओसरीवरच गार पाण्याचे तांब्या-भांडे ठेवतात. आमच्याकडे येणार्‍या पाहुण्यांत अंगणात उतरणारे छोटे पक्षीपण नेहमीच असतात. आम्हीच असे नाही, शेजारीसुद्धा या पाहुण्यांवर दया दाखवित. असलेल्यातले थोडे पाणी जुन्या ताटलीत, भांड्यात घालून कठड्यांवर ठेवीत. एक दिवस माझ्या आईच्या लक्षात आले, चिमुकल्या पाहुण्यांच्या स्वागताची ही आपली रीत योग्य नाही, तिच्यात सुधारणा करायला हवी. घरांत जाऊन तिने संक्रातीच्या वाणातली सुघटं शोधली नि त्या छोट्या छोट्या मडकुल्यांतून पाखरांसाठी पाणी घालून ठेवले. तिचं निरिक्षण दाद द्यावंसंच. धातुची भांडी उन्हात तापतात, त्यांतले पाणी गरम होते, कधी कधी वाफ होऊन संपून जाते. बिचारी पाखरे आशेने येतात तर त्यांना मिळतात चटके. आपण माणसांना देतो तसेच थंड पाणी पाखरांसाठीही ठेवावे, वाफ होण्याची क्रिया मंदावल्याने ते दीर्घकाळ टिकेलही ही तिची जाणीव! अमोलच्या स्वरांत आईची सहभावना उतरलेली.
पाणी पितांना खारू ताई
आईचा हा प्रयोग खूपच यशस्वी झाला. पाखरे येत. मडक्यात चोच घालून पाणी पितांना त्यांना मजा येई. कदाचित आतल्या गारव्याचा आल्हाद त्यांना तिकडेच गुंगवून ठेवी. पण पाखरे कधीच स्वार्थी नव्हती. एकानेच पाण्यात खेळून वेळ घालवला नि अनेकांना पाणी प्यायलाही नाही मिळाले असे होत नसे. अमोलच्या या वाक्याने माझी गोष्टसमाधी एकदम भंगली, “उन्हाळ्यात चेन्नईतील लोकांना प्यायला पाणी नसे पण आय. आय. टी. तला आमचा पोहण्याचा तलाव तेव्हाही भरलेला असे. आम्ही खूप मजा केली आहे मॅडम” माझ्या एका शिक्षकांचे खूप वर्षांपूर्वी ऐकलेले शब्द, तेव्हाही त्याचे मला बसलेले चटके आता पुन्हा जाणवले. मी मध्येच थांबवून अमोलला हे सांगितले तर तो पटकन म्हणाला, मॅडम पाखरे स्वार्थी नव्हेत, ती कृतज्ञ होत याचीच तर गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे.
आता त्याची गोष्ट ऐकायलाच हवी. तर झालं काय, आईने पाखरांसाठीची पाणपोई उन्हाळाभर मोठ्या प्रेमाने चालवली. सुट्टीत मुले घरी आली तर त्यांनाही हा वसा सांगितला. त्यांनीही तो घेतला, नेटकेपणाने पार पाडला. आणि एके दिवशी आश्चर्य घडले. हो, आश्चर्यच. सकाळी सकाळी दार उघडताच अमोलला काही बदाम तिथे पडलेले दिसले. बदाम कुणी आणले घरात, कि शेजार्‍यांचे चुकून पडलेत याची चौकशी करता, बदामांचा इतक्यात कुणी विचारही केलेला नाही असे आढळले. आसमंतात कुठे बदामाचे झाड नसतांना आपल्या दारात बदाम आले कुठून हे अमोलसाठी कोडेच होते. बदाम वेचून घरात ठेवले. उरलेला दिवस नेहमीप्रमाणे निघून गेला. दुसरे दिवसाची सकाळही याच चमत्काराने. पुढे सतत काही दिवस हा चमत्कार घडत राहीला. अगदी त्या जमवलेल्या बदामांचे दोन-तीनशे ग्रॅम बदामबी झाले. घरी आलेल्या मुलांसाठी दररोज आठवणीने हा खुराक दारात ठेवून पसार होणारा सांताक्लॉज कोण हे कोणालाच कळाले नाही. 
किती अंतरावरुन वार्‍याने बदाम आमच्या अंगणांत येऊन पडू शकतील याचा अंदाज बांधण्यासाठी बदामाच्या झाडाच्या शोधात मी कित्येक सकाळी दूर दूर पायपीट केली पण व्यर्थ. एकही झाड मला सापडले नाही. आणखीही एक प्रश्न होताच, बदाम केवळ आमच्याच दारात का पडतात? शेजारच्या कोणत्याच दारी कधीच का नाही? विचारात चाललो असता माझ्या मागून आलेली पाखरे माझ्या डोक्यावरुन उडत माझ्या पुढे गेली… माझ्या डोक्यात प्रकाश पाडून असे म्हणावे का? मॅडम, कुणी काही म्हणो, माझी खात्री आहे, आमच्या दारांतले बदाम ही आमच्या आईच्या प्रेमाची तिच्या मुलांसाठी तिच्या चिमण्या पाखरांनी दिलेली कृतज्ञता भेट होती. अमोलची गोष्ट संपली होती. माझ्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रु त्या पाखरांसाठी ठेवून…
माझे अश्रु केवळ त्या पाखरांसाठी का होते? माझ्या अमोलवरच्या कृतज्ञतेच्या संस्कारासाठी नि त्याच्या आईच्या कृतज्ञतेच्या जाणीवेसाठीही ते होते…  गणित आणि विज्ञानाच्या पलिकडे असलेले हे कोड्याचे उत्तर असू शकते असा मुल्यसंस्कार माझ्यावर करणार्‍या अनेक अनाम पालकांची, माझ्या गुरुजनांची पाखरमाया जणूं माझ्या डोळ्यांत दाटली होती…

-अंबुजा
२४/०२/२०१२
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s