Quote

मी संस्कृत का शिकावं?


(हे शब्द माझे नाहीत.हे लिखाण माझी गुरु,  मार्गदर्शक, दिशादर्शक, मैत्रीण अंबुजा साळगावकर यांच्या कडून आलेल्या E-mail मधून त्यांच्या परवानगीने इथे प्रकाशित करत आहे.)

Rigveda (padapatha) manuscript in Devanagari, early 19th century source:wikimedia

मागच्या पिढीमध्ये पाली आणि अर्धमागधी पेक्षा संस्कृत शिकणं हे हुशार मुलांच्या प्रतिष्ठेचं लक्षण होतं. आजच्या पिढीमध्ये संस्कृत scoring subject  म्हणून घेतात.
मी संस्कृत का शिकते? किंबहुना संस्कृत का शिकावं असं मला वाटतं?

संस्कृत – देवांची भाषा – a classical language म्हणून गौरविलेली तर संस्कृतला असा अभिजात भाषा हा दर्जा का प्राप्त झाला हे समजून घेणं हा एक उद्देश जरुर आहे. त्यासंदर्भात विचार करता काही मुद्दे लक्षात येतात ते असे,
१. भाषेचं सौंदर्य – जिने प्रतिभावंताना रचनेसाठी प्रेरणा दिली, ज्या रचनांचे लोक ’सुंदर’ म्हणून पिढ्यांपिढ्या कौतूक करताहेत. लोकांना भाषासंपन्न करण्याच काम या भाषेनं केलं नि स्वत: समृद्ध झाली. वाचनाने, पठणाने सु-संस्कृत बनण्याने लोक केवळ शिक्षित नाही तर बहुअंगी सुशिक्षित आणि सुचरित घडले असा इतिहास आहे.
हे उदाहरण आहे ऋग्वेदातील वामियसूक्ताचं:

अस्य वामस्य पलितस्य होतु:

तस्य भ्राता मध्यमो अस्त्याश्न:

तृतीयो भ्राता घृतपृष्ठोस्ययापश्याम

विशपतिम् सप्तपुत्रम्।

ही आहे सूर्यस्तुती – उर्जेच्या स्त्रोताशी कृतज्ञ राहण्याचा संस्कार. याचा एक श्लेष पुरवतो सूर्याचं शास्त्रीय वर्णन आणि यामध्ये दडलेल्या आहेत सूर्य-पृथ्वी, सूर्य-मित्रतारा यांमधील अंतराच्या कटपयादि संख्या!
एकाचवेळी जनसामान्यांना, कवीमनांना आणि शास्त्रज्ञांच्याही प्रतिभेला आव्हान ठरु शकेल असे यासारखे उदाहरण इतरत्र विरळाच.
दुसरे उदाहरण आहे,

भपञ्जर: स्थिरो भूरेवावृत्यावृथोद्यास्तमयौ कल्पयति नक्षत्र गृहाणाम्

अर्थ आहे, पृथ्वी गोल असून ती सूर्याभोवती फिरते. आमच्या भास्कराचार्यांनी हे लिहीलं तो काळ 150 A.D. चा आणि आपल्याला माहीत असलेले कोपर्निकस नि गॅलिलिओ इसवीसनाच्या 16 व्या शतकातले. तर असे खजिने तिथे जमून राहीले आहेत. त्यांचा मुळांतून शोध घेण्यासाठी मला संस्कृत शिकायला हवे ना…

२. भाषाशास्त्रज्ञांच्यामते संस्कृत ही इंडो-आर्यन भाषांची जनई आहे आणि द्रविडी भाषांचा संस्कृतवर प्रभाव आहे. हेच पाहा ना, ब्रदर हा शब्द भ्राता या शब्दाच्या किती जवळचा, तसेच फादर पितरच्या नि मदर मातर च्या किती जवळचे आहेत. भारतीय भाषांमध्ये नि संस्कृतमध्ये 50-60% शब्दसाधर्म्यता आढळते. याचाच अर्थ, संस्कृत शिकाल तर इतरही भाषा जवळच्या वाटायला लागतील ना… आजच्या ग्लोबल व्हिलेजच्या जमान्यात संवादासाठी ही किती उपयोगी बाब ठरते!
३. नॅचरल लॅंग्वेज म्हणजे मनुष्यांच्या भाषा शिकण्यासाठी संस्कृत हे चांगले माध्यम आहेच पण यंत्रांना सूचना देण्यासाठीसूद्धा संस्कृत हे चांगले माध्यम आहे असे सिद्ध झाले आहे. नासाचे एक शास्त्रज्ञ प्राध्यापक रिक ब्रिग्ज म्हणतात, फॉर्मल लॅंग्वेजेस (उदा. संगणकाच्या भाषा) पेक्षाही, संगणक आज्ञाप्रणालींसाठी संस्कृत ही अधिक सक्षम अशी नॅचरल लॅंग्वेज आहे. आज्ञाप्रणालीवरून आठवलं, आद्य संगणकाचे जनक सर चार्ल्स बॅबेज यानी म्हटलंय, पाणिनीचे व्याकरण ही एक आज्ञाप्रणालीच आहे. मनात येतं, फॉर्मल नि नॅचरल या दोन्ही प्रकारचा संवद उत्तम तर्‍हेने साधणारी म्हणून का ती संस्कृत? सम्-स्कृत अर्थात well fromed / well written?
४. संस्कृती जिने निर्माण केली ती अशीही ती संस्कृत आहे. केवळ संस्कृतचा वारसा ही एकच गोष्ट म्हणून आम्हास श्रीमंत बनविण्यास पुरेशी आहे असं भारताच्या स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरु म्हणाले होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील आपल्या पूर्वजांची मजल समजून घेऊन वर्तमानात त्या ज्ञानाचा उपयोग करता यावा यासाठी संस्कृत शिका असे आपले अलिकडच्या काळातले राष्ट्रपती शास्त्रज्ञ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम म्हणाले होते. आत्मिक आणि सामाजिक या जाणीवांमध्ये सुसंवाद राखून प्रगती करण्याचे शिक्षण केवळ संस्कृतच्या प्रसारातून घडेल असा विश्वास भारताचे पहिले राष्ट्रपती, बाबु राजेंद्रप्रसाद यांनी एका व्याख्यानात व्यक्त केलेला होता. प्रसिद्ध पत्रकार सईद नक्बी यांनी एका मुलाखतीत म्हटलंय, साडी, संगीत नि संस्कृत हे भारतीयत्वाचे तीन निदर्शक आहेत! राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक आणि बौद्धिक या चारही क्षेत्रातले आदर्श आपल्याला संस्कृत तत्वज्ञानांतून प्रकटतांना दिसतात. सुभाषितांतून उमटलेली ही काही हृद्गते पाहा. हिमालयाच्या दक्षिणेस नि (हिंदु) समुद्राच्या उत्तरेस पसरलेल्या भूभागाचे जे पुत्र ते (आम्ही) भारतीय. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु, कावेरी या सार्‍यांनी आमचे ’जीवन’ बनले आहे. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका इथे आमची संस्कृती फुलली, राम-कृष्ण-युधिष्ठिर हे आमचे आदर्श. वेद, श्रुती-स्मृती, ज्योतिष-गणित, काव्य यांचे निर्माते ऋषी-मुनी, आचार्य, पंडीत, कवी, भारद्वाज, भागीरथ,  पाणिनी, बोधायन, कालीदास, भास ही आमची बौद्धिक परंपरा, अखिल महाभारतासाठी हे सारे सारखेच आहे ना…  विश्वबंधुतेची भावना इथे जपली जाते आहे. पॅरीसच्या विद्यापिठातील प्राध्यापक लोव्हिस रोनॉं म्हणतात, कुणाला रुचो, न रुचो हे मान्य करावे लागेल कि संस्कृत हे भारताच्या उभारणीत सिमेंट बनून राहीले आहे.
५. wikipedia च्या आकडेवारीनुसार जगाच्या 680,000,00,000 (अडुसष्ट हजार लाख), इतक्या लोकसंख्येपैकी केवळ 50,000 लोकांना संस्कृत बोलता येतं, सम्जून चालू की दोन-पाच लाख लोकांना संस्कृत माहिती आहे. तरी याचा अर्थ दर तेरा हजारी एखाद्या मनुष्यास संस्कृतचा गंध आहे असा होईल. जगामध्ये, पारशी, मुस्लीम, ख्रिश्चन अशा कितीतरी अ-हिंदु लोकांनी संस्कृतमध्ये नैपुण्य मिळविल्याची उदाहरणे आहेत. अलिकडच्या काळांत संस्कृत कंप्युटेशनल लिंग्विस्टिक मधले उत्तम प्रतीचे काम फ्रान्सदेशी प्राध्यापक ह्युए(ट) यानी केल्याचं उदाहरण उपलब्ध आहे. संस्कृतमध्ये प्राविण्य मिळवल्याखेरीज शहाणपणाचा शोध घेणं क्वचितच शहाणपणाचं ठरणार आहे अशा अर्थाचं विधान करणसिंग प्रभृतींनी एके ठिकाणी केलंय.
पाश्चात्यांच्या जगात संस्कृतला मान आहे. पायथागोरस-प्रमेय हा बोधायनाचा सिद्धांत नि बेकस नॉर्मल फॉर्म हा पाणिनी-बेकस फॉर्म अशी मान्यता मिळालेली आहे. आपल्या विद्यापिठांच्या पदवीदानादि समारंभ प्रसंगी पाश्चात्य विद्यापिठांतून आलेले शुभसंदेश कित्येकदा संस्कृतमध्ये असतात. तेव्हा संस्कृत ही सौंदर्याबरोबर विद्वत्तेची पुंजी तुम्हाला खुली करुन देणारी भाषा हे समजून घेऊन तिचा उपयोग करण्यासाठी म्हणूनही आपण संस्कृत शिकायला हवं.
६. आज पाश्चिमात्य जगतातही सामान्यांना झेपत नाही म्हणून अभ्यासक्रमातून गणित काढून टाका अशा तंत्र-शिक्षणाचा पायाच डळमळीत होइल अशा चळवळी मूळ धरताहेत. इथे मला जाणवतं ते असं, दैववशात विधवा होऊ घातलेल्या अल्पवयीन कन्येचं दुर्दैवी जीवन गणितातलं गम्य शोधताना रम्य होऊन जाईल असा सूज्ञ विचार करुन भास्कराचार्यांतल्या वत्सल पित्याने गणित-ग्रहगणित जे आजही higher math म्हणून ओळखलं जातं त्याची काव्यात्म मांडणी लीलावती या ग्रंथातून केली, त्या रचनांतील नाट्याने झेलम सारख्या नृत्यविदुषीला अविष्कारासाठी साद घातली. त्रिकोणमिती व्यवहारात कितीवेळा लागते, ती शिकलीच पाहीजे का असले वाद करण्यापेक्षा नृत्य पाहा-कुणी गणित शिका अशी जादु केवळ संस्कृतमधल्या अशा ज्ञानसंपदेमुळे घडली आहे.
अशीच एक गोष्ट गेल्या दशकातल्या कंप्युटर प्रोग्रामिंग-च्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड या नव्या ऍप्रोचची. ’गौ’ हा संस्कृत शब्द ’गाय’ या अर्थी, मूळ धातू ’गम्’ म्हणजे हालचाल करणारा – ’प्राणी’ हे क्लास इनहेरिटन्सचे क्लासिक उदाहरण ठरावे ना!
म्हणूनच कदाचित संस्कृत अकादमीच्या वरखेडी-जीं त्यांच्या एका व्याख्यानात उल्लेख करतात, न्याय-व्याकरण आजच्या भाषेत-चर्चेत उपयोगी नाही, मिमांसाअ म्हणे व्यावहारिक नाही असे रडत बसण्यात काय अर्थ? सुदैवाने आज संगणककाळी भाषा म्हणून संस्कृत नव्या दृष्टीकोनातून नव्याने जन्म घेते आहे, गरज आहे ती संस्कृत येणार्‍या नि न-येणार्‍या सर्वांनीच नव्या दृष्टीतून संस्कृत शिकण्याची.
ज्ञानविपुल अशी ही भाषा, त्या ज्ञानाचे भांडार सर्वांना खुले व्हावे म्हणून खूप लोकांनी स्वयंसेवक व्हायचे आहे. ज्ञानसाधन म्हणून संगणक विविधरुपात सज्ज आहेत. स्वयंसेवक हवे आहेत, संस्कृत समजून घेऊन संगणकाचा उपयोग अधिक प्रभावीपणे करण्यासाठी. शासनाचा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभाग, संस्कृत विद्यापीठ, अनेक विद्यापिठांमधून कार्यरत असलेले संस्कृत विभाग असे सरकारी उपक्रम आहेतच, संस्कृतप्रेमी, संस्कृतप्रचारक अशी बरीच हौशी मंडळींची मांदियाळीही मदतीसाठी दिसते आहे. मी संस्कृत शिकते आहे माझा वाटा उचलण्यासाठी.
जाता जाता, आता म्हणे, संस्कृत टॅटूजची मागणी वाढते आहे. कुणी सांगावं, टॅटूजच्या सहवासात लोकांची संस्कृत बद्दलची जिज्ञासा वाढेल. आणखीही कुणी संस्कृत शिकायला येतील.
आपण संस्कृत शिकूया. ज्ञानसाधनेतला सहभाग वाढवू्या!
-अंबुजा

संस्कृत शिकण्यासाठी काही छान पुस्तके

Enhanced by Zemanta
Advertisements

5 thoughts on “मी संस्कृत का शिकावं?

  1. mala ek shanka aahe ki aapan marathimadhye SANSKRUT ase mhanto aani tech hindimadhye SANSKRUT ase uchchartat tar mag khara uchchar konta karava kinva khara uchchar kay aahe SANSKRIT ki SANSKRUT?

    • नमस्कार
      उत्तर सोपे आहे आणि प्रश्नही कारण या एका उत्तराने एक सामान्य नियम समजणार नि अशा प्रकारचे सर्व प्रश्न सुटणार.इथला र सदृष्य वर्ण ऋ हा आहे. ऋतु, ऋषी, वृक्ष, कृष्ण हे शब्द आपण कसे उच्चारता?ते रुतु,रुषी, व्रुक्ष, क्रुष्ण असे नाहीत अथवा रितु, रीषी, व्रीक्ष, क्रिष्ण असेही नाहीत.पण कृष्ण चे क्रिष्न, किसन हे आपल्याला नवे नाही. हिंदीत ऋ कार रि सारखा उच्चारतात.प्राकृतात, प्रकृतीलाही प्रक्रुती असे संबोधतात तसे क्रुष्ण, रुतु नि संस्क्रुत… ते संस्कृतात तसे नाही.पुरेसे शंका समाधान झाले असे समजावे का?धन्यवाद आणि शुभेच्छा.
      -अंबुजा

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s