माहित नाही!


कधी कधी उगीचच सगळं काही असं जुळून येतं ना की आपल्याला कंटाळा आल्याशिवाय पर्यायाच उरत नाही. नेमकी साप्ताह अखेरीची सुट्टी. दोन दिवस करण्यासाठी काहीच नाही. कुठला सुंदर सिनेमाही लागलेला नाही. नाटकाला जावं तर नेमके कितीतरी मित्र शहरात नाहीत. बाकीच्यांना महत्वाची कामं. आणि उरलेल्यांचा अख्खा शनिवार-रविवार अंथरुणातच काढायचा असा ठाम निर्णय. मग आता उगीचच चिडचिड वाढलीये आणि कुठं जावं कळत नाहीये. जवळचे सर्व चित्रपट बघून झालेयत आणि घरात थांबायचं नाहीये.

मग उगीचच Sack खांद्यावर घेतली आणि निघालो काहीच प्लान न करता चालत, माझी आवडती गाणी ऐकत, मे च्या उन्हाची तमा न बाळगत चालत राहिलो. चांगले दोन तीन किलोमीटर चालून मग समोर एक पुस्तकांचं दुकान आणि मग नकळतच आत शिरलो. मनात ल्या मनात आठवत होतो कोणते-कोणते पुस्तक घ्यायचे आहेत. समोर “गांधीजींच्या स्वप्नातील भारत” दिसले, खूप दिवसांपासून ठरवले होते, घेवूयात का? त्याच्याच पलीकडे. शशी थरूर यांनी लिहिलेले “नेहरू” दिसले मग तिकडे वळलो. मग उगीचच Thomas Friedman चे “World is Flat” कितीतरी वेळ चाळत राहिलो. मग “India After Gaandhi”, मग अचानक विश्वास पाटलांच्या “पानिपत” ला हातात घेऊन उगीचच चाळत राहीलो. आता उगीचच वाटायला लागले की आपण खूपच logical पुस्तकं वाचतो आहोत कधीतरी सहज गम्मत म्हणून तरी किंवा काहीतरी बदल म्हणून तरी काहीतरी विनोदी किंवा हलकं फुलकं वाचावं, आणि समोरच द. मा. मिरासदार यांचं “माझ्या बापाची पेंढ” दिसलं आणि मनोमन खुश झालो. म्हटलं चला यातील विनोदी किस्से वाचून तरी थोडं हलकं फुलकं वाटेल.
“माझ्या बापाची पेंढ” ला ब्यागेत टाकून निघालो माझ्या सर्वात आवडत्या ठिकाणी: पुणे विद्यापीठ. मुख्य इमारतीच्या मागच्या बागेत एका मोठ्ठ्या झाडाखाली जरा घाई घाईनेच वाचायला सुरुवात केली. एक एक ओळ उलगडत होती. गावातले विनोदी किस्से, पोट धरून हसवणाऱ्या घटना वाचत होतो, पण कुठेच हसू येत नव्हते. काय झालं होतं? माझी विनोद बुद्धीच संपलीये की काय? उगीचच मला आता जास्तच बेचैन होवू लागलं. आणखी एक एक ओळ पुढे जात होतो. गावा बाहेरचे चिंचेचे रान, आमराई, त्याच्यावरचा सूर पारंब्यांचा खेळ. मित्रांबरोबर तासंतास विहिरीत डुंबणे. कैऱ्यांची चोरी. आंबे पिकवण्यासाठी म्हणून ठरवलेली गुप्त जागा.
पावसाळ्यात दररोज पावसात भिजणे आणि मग आई रागावेल म्हणून बाहेरच अंगावर कपडे सुकवून मग नंतरच घरी जाणे. गावची जत्रा, खर्चासाठी मिळालेले पाच रुपये, गावच्या नाटकांमध्ये घेतलेला भाग, संगीत शारदा मध्ये मी केलेला शारदेच्या मैत्रिणीचा छोटासा रोल. नाटकाच्या तालमी, नाटकाच्या दिवशी जेव्हा थंडीवर उपाय म्हणून शारदेचा रोल करणारे दिलीप मामा स्टेज च्या मागे शारदेच्या वेशात (साडी आणि भरपूर दागिने) विडी ओढत होते तेव्हा माकडासारखे हसलेलो आम्ही आणि मग नाटकाच्या व्यवस्थापकाने दिलेला दम,
गावात होणारे ज्ञानेश्वरी, गाथा, गीता पारायण. आम्ही घेतलेला भाग. खूप मन लावून ज्ञानेश्वरी वाचली होती २-३ वेळा, कीर्तनकार महाराजांना प्रश्न विचारून विचारून वैतागून सोडले होते. मंदिरातल्या वीणेच्या तारांवरून हात फिरवण्यासाठी केलेली धडपड आणि उगीचच मध्ये मध्ये करू नका म्हणून आम्हाला हाकलून लावले होते वीणा वाजवणाऱ्या माणसाने, मग आमच्या टोळीने डाव करून रात्री गुप चूप जावून मनसोक्त वीणा वाजवली होती आणि शेवटी एक तार आता निखळून गेली आहे म्हणून घाबरून ती विना तशीच ठेवून पळ काढला होता.

गावातले पडके वाडे, तिथल्या भूत खेतांच्या अफवा, कुणीतरी सांगायचं त्या वाड्यात सोन्याने भरलेला हंडा आहे आणि मग आमच्या टोळीने त्या वाड्याला दिलेली भेट. खूप आत अंधारात गेल्यावर जेव्हा एका वटवाघळाने माझ्या डोक्यावर landing केलं होतं आणि तेव्हा माझी जी भीतीने गाळण झाली होती ती.

गावातली शाळा, मारके मास्तर, इतिहासाचा तास, माझ्या दप्तरात सापडलेली बोरे, पायाचा अंगठा धरून तासभर उभं राहण्याची झालेली शिक्षा, तरीही नंतर मास्तर वर्गाबाहेर निघून गेल्यावर आम्ही कसे खी खी करून मुर्खासारखे हसलो होतो त्याची आठवण. माझा निबंध स्पर्धेत आलेला पहिला नंबर आणि मग मला भेट म्हणून मिळालेला मोरपीस, वर्गातल्या एका कांता नावाच्या मुलीकडून, खूप दूर मळ्यातून ती मुलगी शाळेत यायची, अनवाणी. खूप हुशार होती, सातवीत असतांनाच लग्न झाले तिचे.
विनोदी पुस्तक वाचून पोट धरून हसू असं वाटलं होतं पण मी तर माझा गाव, माझे बालपण आठवून एक एक आवंढा गिळत होतो. पुस्तकातल्या एक एक वर्णनानंतर तर मी आणखीनच माझ्या गावातल्या आठवणींमध्ये मागे जात होतो. त्या विनोदांनी हसण्यापेक्षा आता एक एक आवंढा गिळत होतो. काय होत होतं? कुणास ठावूक? पण आता बिलकुल वर्तमानात यायची इच्छा होत नव्हती.
अजूनही आठवतो तो दिवस जेव्हा मी माझा गाव सोडून पुढील शिक्षणासाठी शहरात जाणार होतो. आदल्या दिवशीच आईने आवरून दिलेली पिशवी, तिने दिलेल्या हजार सूचना. आई-वडिलांची घालमेल. त्या दिवशी माझे वडील काही बोललेच नव्हते. घरातून निघतांना जेव्हा खूप रडलो होतो तेव्हा आई म्हणाली होती, “मृत्युंजय वाचतोस ना? मग त्याच्यात कर्ण नाही का आपले गाव सोडून गेला होता मोठ्या शहरात? मग तू काय शिकलास मृत्युंजय वाचून?” आणि मी माझा गाव सोडून शहरात आलो होतो, शिकण्यासाठी, मोठं होण्यासाठी(?).
खूप दूर आलो आहोत आपण, आता पुन्हा परत दिसतील का ते दिवस? माहित नाही! शिकायचं, मोठं व्हायचं, परिस्थितीच्या डोक्यावर पाय देवून उभं रहायचं ठरवलं होतं. पण आज पुन्हा मागे वळून पाहिलं तर वाटतं खरच आपण काही कमावलं आहे का? कमावलेल्या आणि गमावलेल्या गोष्टींची यादी केली तर कमावलेल्या गोष्टी खरंच जास्त आहेत का?
माहित नाही!

6 comments

  1. Alka · May 16, 2011

    खुपच छान !!!

  2. Vikram Bhimbar · May 16, 2011

    अप्रतिम अमोल

  3. Pallavi · May 16, 2011

    खूप साध्या सरळ भाषेत आणि थेट मनापासून लिहिला आहे हा ब्लॉग…
    जो वाचकांच्याही मनापर्यंत पोहोचतोय … 🙂
    प्रत्येकाला आपल्या बालपणीची आठवण करून देईल हा ब्लॉग ..खरंच “रम्य ते बालपण ”
    पण अमोल आपल्याला पुढे जायचं असेल तर comfort झोन सोडावाच लागतो.. पण हि जी भूतकाळाची शिदोरी आहे ती आपल्याला आयुष्यभर पुरणारी आहे.. पुढची आव्हानं पेलण्याची ताकद देणारी आहे …

  4. Prerana · May 16, 2011

    खरच वाचनारा माणूस सुद्धा गाव कदच्या वातावरनaaत हरवून जातो
    छान प्रकारे मनातल्या भावना मंडल्या आहेस …

  5. Sudhakar Wabale · May 19, 2011

    अमोल, विनोद बुद्धी हरवली नाहीये. नुसता हसवणारा विनोद नसावा तर तो वाचता वाचता अंतर्मुख करणारा असावा. मला वाटते तूझा ओढा अंतर्मुखतेकडे आहे म्हणूनच विनोद कळतो पण वाचून हसू येत नाही.
    कोणतेही काम करताना हृदयात शांती निर्माण होते कि अशांती यावरूनच आपण चांगले काम करतो कि वाईट हे आपले अंतःकरण ठरवत असते. तुला शांत जागा आवडते आणि ती तुला लहानपणाच्या निरागस आठवणीत सापडली म्हणून तू तेथे रमलास आणि सोबत इतरानाही रमवलस.

  6. mangesh · August 4, 2011

    अमोल
    जी ए. कुलकर्णी यांचे पुस्तके ,पत्र वाचाल्यामुले जो एक अनुभव मिलतो तोच तसाच अनुभव आज. अल्यासरखा वाटतो . भाषेच्या सौन्दर्यमुले हे खुपच भावते . मनाला खुप भिड़ते, हलवे करते . विशेष म्हणजे शेवटी मनाला उभरी देते हे सर्वात विशेष .नाकि अस्वस्थ करत रहते.

    धन्यवाद साले साहेब

Leave a reply to Vikram Bhimbar Cancel reply